शून्याचा शोध
श्रेष्ठ भारतीय शास्त्रज्ञांनी लावलेला शून्याचा शोध ही जगाला दिलेली एक अद्भुत भेट आहे हे जगातल्या विद्वानांनी मान्य केले आहे. सर्वाधिक लोक त्याचे श्रेय आर्यभट यांना देतात, तर बरेचसे लोक ते ब्रह्मगुप्त यांना देतात. काही लोकांच्या मते आर्यभटांच्या आधी होऊन गेलेले विद्वान पिंगला यांनी किंवा त्यांच्याही पूर्वी कोणा अज्ञात विद्वानांनी तर काहींच्या मते नंतरच्या काळातल्या भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला. मग प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये निरनिराळ्या संख्यांचे उल्लेख कसे येतात अशी शंका आपल्या मनात येते. रावणाला दहा तोंडे होती तर कौरवांची संख्या शंभर होती. विष्णुसहस्रनाम प्रसिद्ध आहे. कार्तवीर्यार्जुनाला हजार हात होते, तर सगराला साठ हजार पुत्र होते. गणेशाचे वर्णन "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ" असे केले आहे आणि श्रीरामाची स्तुती "चरितम् रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्" अशी करून "सहस्रनामतत्तुल्ल्यम्" अशी रामनामाची महती सांगितली आहे. पौराणिक कथा आणि स्तोत्रे यांमध्ये मोठमोठ्या संख्यांचे उल्लेख असलेली अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यांची रचना झाली तेव्हा