महान प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ (भाग ३)

महर्षी चरक, सुश्रुत व पतंजली हे प्राचीन काळातील भारतीय शास्त्रज्ञ, आर्यभट, भास्कराचार्यादी इतिहासकाळातील भारतीय शास्त्रज्ञ आणि कोपरनिकस, न्यूटन वगैरे पाश्चात्य शास्त्रज्ञ यांत मी भेदभाव करतो आहे असे वाटण्याची शक्यता आहे. मला तसे करणे भाग आहे. माझ्या मते एकाच फूटपट्टीने त्यांची थोरवी मोजता येणार नाही. मुख्य म्हणजे त्यांचे सांगणे आपल्यापर्यंत ज्या प्रकारे पोचले आहे त्यात महत्वपूर्ण फरक आहे.
मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे चरक, शुश्रुत व पतंजली यांनी ज्या आयुर्वेद व योगशास्त्र या विषयांवर ग्रंथरचना केली आहे ती शास्त्रे गुरुशिष्य किंवा पितापुत्रपरंपरेतून पिढी दर पिढी पुढे येत आजपर्यंत पोचली आहेत. रोगनिवारण आणि शरीर व मनाचे आरोग्य राखण्यासाठी प्रत्येक पिढीत त्यांचा उपयोग होत आला आहे. त्यातून मिळालेल्या अनुभवाने त्यातील सिध्दांत किंवा उपचार सिध्द झाले आहेत तसेच अनुभवातून ही शास्त्रे समृध्द होत गेली आहेत.
आर्यभट, भास्कराचार्यादींचे खगोलशास्त्रांविषयीचे ज्ञान अशा प्रकारे त्यांच्या शिष्यांच्या परंपरेतून आपल्यापर्यंत पोचले असे दिसत नाही. गांवागांवात जसे शास्त्री, पंडित, वैद्य असायचे तसे खगोलशास्त्रज्ञ असल्याचे ऐकिवात नाही. ज्योतिष सांगणारे विद्वान नवग्रहांच्या कुंडलीमधील भ्रमणावरून आपले जातक सांगत आले आहेत. सूर्यमालेची रचना, तारे, ग्रह आणि उपग्रह वगैरेंची शास्त्रीय माहिती आपल्याला या ज्योतिषांकडून मिळालेली नाही. त्यांच्या शास्त्राप्रमाणे सूर्य, चंद्र , गुरू, शुक्र हे सारे ग्रहच असतात. त्यांना वेगवेगळे व्यक्तीमत्व असते, त्यांना राग येतो किंवा ते खूष होतात आणि आपले बरे वाईट करू शकतात, किंबहुना तेच हे सगळे करतच असतात. प्रत्यक्षात ते महाकाय पण निर्जीव गोलक आहेत आणि आपापल्या कक्षांमधून काटेकोरपणे फिरत असतात ही त्यांची खरी वस्तुस्थिती आपण पाश्चात्य देशात झालेल्या संशोधनावरून शिकलो आहोत आणि ती ज्योतिषांच्या समजुतींशी सुसंगत नाही.
आर्यभट, भास्कराचार्यादी शास्त्रज्ञांनी लिहिलेले ग्रंथ संस्कृत भाषा किंवा वाङ्मयाचा अभ्यास करणा-या विद्वानांनी वाचून प्रकाशात आणले असावेत. भारतातील ज्योतिषशास्त्राच्या मुख्य प्रवाहात त्यातले ज्ञान आल्यासारखे दिसत नाही. इतर कोणा विद्वानांनी त्याची दखल घेतली असल्याचेही दिसत नाही. त्या ग्रंथांमध्ये नेमके काय काय लिहिले आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत अजून पोचलेले नाही. त्यावर तज्ञ खगोलशास्त्रज्ञांनी साधक बाधक चर्चा घडवून आणली, कोणी त्यांचे समर्थन केले, कोणी विरोध केला, कोणी शंका व्यक्त केल्या, कोणी त्यांचे निरसन केले वगैरे काही घडल्याचे निदान माझ्या ऐकिवात नाही.  पश्चिमेकडून आलेले खगोलशास्त्र आज इतके पुढे गेले आहे की हजार वर्षांपूर्वी इतर कोणी काय लिहिले आणि त्यातले किती बरोबर आणि किती चुकीचे आहे वगैरे पहाण्यात आता कोणाला रस असणार नाही, कारण त्या शास्त्राच्या पुढील अभ्यासाच्या दृष्टीने या ग्रंथांची उपयुक्तता आता राहिलेली नाही.
कोपर्निकस, गॅलीलिओ वगैरेंची गोष्ट त्याहून वेगळी आहे. या लोकांनी जे संशोधनकार्य केले त्याला त्यांच्या हयातीत विरोधच झाला होता. पण कांही वैज्ञानिकांना त्यांच्या सांगण्यात तथ्य आढळले. त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. त्यांना त्यात आढळलेल्या त्रुटी त्यांनी आपल्या संशोधनातून भरून काढल्या, दिसलेल्या चुका सुधारल्या आणि त्या ज्ञानात आपली मोलाची भर टाकली. अशा प्रकारे त्यातून आधुनिक खगोलशास्त्राचा विकास होत गेला. त्यात एक सातत्य असल्यामुळे जुन्या शास्त्रज्ञांनी केलेले बरेचसे कार्य मूळ स्वरूपात जगाला उपलब्ध होत गेले. तसेच त्यावर भरपूर चर्चा झाली, त्याची छाननी, विश्लेषण वगैरे होऊन ते सुसंगत स्वरूपात मांडले गेले आणि सुलभपणे मिळू शकते. आजचे खगोलशास्त्र या लोकांनी केलेल्या पायाभूत संशोधनाच्या आधारावर उभे असल्याने त्यांचे कार्य त्यामधील त्रुटींसकट आज शिकले आणि शिकवले जाते. त्यामुळे त्याबद्दल जेवढी सखोल आणि सलग माहिती मिळते त्या मानाने प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्याबद्दल मिळणारी माहिती कमी आणि तुटक स्वरूपाची असते. त्यांची एकमेकांशी तुलना करून जे एकाने सांगितले तेच दुस-याने सांगितले होते की कांही वेगळे मांडले होते ते सुद्धा समजत नाही. आता इतक्या काळानंतर आणि पूर्ण माहिती हाताशी नसतांना तशी तुलना न करणेच माझ्या मते इष्ट आहे.
भारतीय शास्त्रज्ञ अंधारात कां राहिले याच्या मागे एक वेगळेच कारण असावे असा माझा अंदाज आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पूर्वापारपासून चालत आलेला एक समज आहे. त्या समजानुसार जगातील सर्व ज्ञानाचा उगम ब्रह्म्यापासून झाला. त्याने ते ज्ञान आपल्या पुत्रांना दिले आणि त्यांच्या शिष्यवर्गामार्फत त्याचा प्रसार होत गेला. अशा प्रकारे जगातले सर्व ज्ञान अपौरुषेय स्वरूपाचे आहे. त्यात फेरफार करण्याचा अधिकार मर्त्य मानवाला नाही. त्याला त्याच्या गुरूकडून जे ज्ञान प्राप्त होईल त्याचाच त्याने उपयोग आणि प्रसार करावा. त्यात बदल किंवा वाढ करण्याच्या भरास पडू नये. अशा प्रकारच्या ज्ञानसंपादन व संवर्धनाच्या प्रक्रियेत कोणी नवा विचार मांडला तर तो स्वीकारला जाणे दुरापास्त होते कारण कोठल्याही गोष्टीवर निर्णय घेतांना जुना शास्त्राधार पाहिला जात असे. त्यामुळे आर्यभट व भास्कराचार्यासारख्यांनी त्या काळातल्या समजुतींच्या विपरीत कांही सांगितले असले तरी इतरांनी ते मान्य केले जाण्याची शक्यता कमीच होती. कदाचित त्यांचे विचार त्यांच्या ग्रंथातच पडून राहिले असावेत. गुरूशिष्य किंवा वंशपरंपरेनुसार प्रसारित होणा-या ज्ञानभांडारात ते समाविष्ट झाले नसावेत असा आपला माझा तर्क आहे.
वेगवेगळी स्तोत्रे, पुराणे वगैरेंची रचना करणा-या ऋषींची व आचार्यांची नांवे त्यांच्या रचनांना ….कृत किंवा …विरचित म्हणून जोडलेली आहेत. परमेश्वराचे गुणगान, प्रार्थना किंवा त्याच्या कथा त्यात असतात. त्यांच्या कर्त्यांची शैली, भाषेवरील प्रभुत्व आणि प्रतिभा यांचे दर्शन त्यात घडते. विश्वाची रचना किंवा भौतिक वस्तूंचे गुणधर्म, त्यांच्याविषयी नवे विचार, कल्पना, सिद्धांत वगैरे ज्या गोष्टी सायन्स या विषयाखाली येतात, त्यांना आपल्या पोथ्यापुराणात स्थान नव्हते. पाश्चिमात्य देशात गणित व विज्ञानातील प्रमेये, नियम, समीकरण, सूत्र वगैरेशी त्या त्या संशोधकांची नांवे जोडलेली आहेत. ‘पायथॅगोरस थीरम’, ‘आर्किमिडीज प्रिन्सिपल’, ‘न्यूटन्स लॉज’ वगैरे शेकड्यांनी उदाहरणे देता येतील. गेल्या शतकात ज्या भारतीय वैज्ञानिकांनी बहुमूल्य संशोधन केले त्यांनासुध्दा ‘रामन इफेक्ट’, ‘चंद्रशेखर नंबर’ वगैरे नामकरणातून अमरत्व प्राप्त झाले आहे. प्राचीन भारतात अशी प्रथा नसावी कारण “मी अमूक शोध लावला अशी प्रौढी कोणी मारत नसे” किंवा “त्याने हे सर्वात आधी सांगितले” असे श्रेय त्याला दिले जात नसेल. सगळे ज्ञान वेदामधूनच आले अशी दृढ समजूत असेल तर कोणीही नवा शोध लावण्याचा प्रश्नच उठत नाही. दुसरी एक खुळचट समजूत अशी आहे की सत्ययुगातली माणसे सर्वश्रेष्ठ होती, त्यानंतर त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलीयुग या काळात त्यांची फक्त अधोगतीच होत राहिली आहे. त्यांनी कोणत्याही क्षेत्रात प्रगती केली असणे शक्यच नाही. अशा प्रकारच्या वातावरणात त्या शास्त्रज्ञांच्या विनयामुळे किंवा इतरांच्या आकसामुळे पूर्वीच्या भारतीय शास्त्रज्ञांची नांवे त्यांनी केलेल्या महत्वाच्या योगदानासह कुठल्या ताम्रपटावर किंवा शिलालेखावर खोदून ठेवली गेली नसावीत. शेकडो किंवा हजारावर वर्षे ती जवळपास विस्मृतीत गेली होती. मध्ययुगातील बखरींमध्ये, लोकगीतांत, संतवाङ्मयात किंवा तत्सम जुन्या दस्तावेजांत त्यांचा उल्लेख येत नाही. त्यांनी लिहिलेल्या आणि आता सापडलेल्या जुन्या ग्रंथांच्या अलीकडल्या (गेल्या शतकांतल्या) काळात झालेल्या वाचनात त्यांनी प्रतिपादलेल्या काही गोष्टी पाश्चिमात्य संशोधकांच्या प्रसिद्ध सिद्धांताच्या जवळपास वाटल्या. त्यामुळे त्यांचे कालौघात हरवलेले कार्य प्रकाशात येऊन त्यांची नावे आता पुन्हा आदराने घेतली जाऊ लागली आहेत. पाश्चिमात्य संशोधकांच्या अद्याप लक्षात न आलेली एकादी गोष्ट या जुन्या ग्रंथात सापडली आणि त्यामुळे आपल्या विज्ञानात भर पडली असे उदाहरण दिसत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती

स्वाध्याय अतिक्रमण