आयुर्वेद कोश ~ नाडी परीक्षा : शास्त्र की मस्करी ??
खुलता कळी खुलेना या मालिकेच्या निमित्ताने 'नाडी' परीक्षा यावर प्रचंड मस्करी सुरु आहे . हवा येऊ द्या सारख्या टाईमपास मालिकेचा शिक्षणाने वैद्य असलेला सूत्रसंचालक सुद्धा नाडी परीक्षा करायची आहे मग विजार /पायजमा कोठे आहे ? असे तद्दन फालतू विनोद विनाकष्ट प्रसवताना दिसून येतो . खुलता कळी खुलेना चा नायक लग्नाचे फेरे घेत असताना होणाऱ्या बायकोचा हात हाती घेतो आणि साहेबाना समजते की या गरोदर आहेत . . त्या दिवसापासून आज अखेर नाडी परीक्षा यावर मस्करी होत आहे आणि पर्यायाने आयुर्वेदाची सुद्धा मस्करी होत आहे . . .
नाडी परीक्षा यास गेल्या पाच एक वर्षात 'अमूल्य ' महत्व आले आहे . जणू काही नाडी परीक्षण हा २०१० मध्ये लागलेला शोधच जणू . रस्त्यावर पाट्या दिसतात 'नाडी तञ् ' , ' नाडी परीक्षण करून निदान ' वगैरे . . आमच्या गुप्तहेरांनी आणलेल्या विश्वसनीय बातमीनुसार काही 'हाय फाय सर्कल ' मध्ये असे 'नाडी वैद्य ' उठबस करतात आणि रग्गड पैसे कमवतात . अर्थात आमचा आक्षेप पैसे मिळवणे यावर नसून तो तुम्ही 'कोणत्या मार्गाने ' ,मिळवता यावर आहे . प्रत्येक वैद्य हा नाडी परीक्षण करत असतो . शतकानुशतके करत आलेला आहे . त्याचा 'बाजार ' मात्र आजवर कोणी मांडला नाही . तो बाजार आज सर्वत्र मांडला जात आहे . मी देखील यथा बुद्धी नाडी परीक्षा करायचा प्रयत्न करतो पण मला नाडी १००% समजते आणि मी नाडी तञ् आहे असे म्हणायचे मी 'धाडस ' करणार नाही . माझा नाडी परीक्षणाचा अभ्यास अजून सुरु आहे .त्यामुळे रुग्णांना आकर्षित करायला मी अर्धसत्य सांगू शकत नाही .
आता नाडी १०० % समजत नाही म्हणजे मी वैद्य नाही किंवा जी रुग्णसेवा करतो त्यात प्रतारणा करतो असे आहे का ?? अजिबात नाही . . .
आयुर्वेदीय रोग निदान आणि रुग्ण परीक्षण हे केवळ 'नाडी ' परीक्षण या एकाच मुद्द्या भोवती एकवटलेले नाही . तसे असते तर आर्ष ग्रंथात ( चरक ,सुश्रुत ,वाग्भट ) नाडी परीक्षण यावर अध्यायांवर अध्याय आले असते . पण तसे दिसत नाही . नाडी परीक्षण यास महत्व लघुत्रयी (भाव प्रकाश , योग रत्नाकर , शारंगधर ) यात दिसून येते . असे असले तरी पूर्वरूप , रूप , संप्राप्ती यात जी रोग लक्षणे आहेत त्यात नाडी अशी लागते असे वर्णन आलेले माझ्या तरी वाचनात नाही . त्यामुळे आयुर्वेदीय निदान म्हणजे केवळ नाडी परीक्षण असे नक्कीच नाही . हे माझे स्पष्ट मत आहे . नाडी , मल , मूत्र , जिव्हा इत्यादींचे समग्र परीक्षण करून , दर्शन , स्पर्शन , प्रश्न याची मदत घेऊन , प्रत्यक्ष , अनुमान आणि युक्ती या प्रमाणांचा वापर करून निदान चिकित्सा करणे यास आयुर्वेदीय पद्धत असे ढोबळमानाने म्हणता येईल .
नाडी परीक्षण हा अत्यंत गुह्य असा विषय आहे . नाडी शिकता येत नाही . शिकवता सुद्धा येत नाही . ती समजावी लागते . ती कोणाला समजते ?? '' नाडी परिचयो लोके प्राय : पुण्येन जायते ' म्हणजे ज्याकडे पुण्य किंवा क्षमता असेल त्याची योग्यता असेल तर नाडी समजते . आता पुण्य म्हणजे काय ?? सकारात्मकतेचा संचय यास पुण्य अशी माझी सोपी व्याख्या आहे . इतरांच्या शरीरात -मनात काय सुरु आहे हे समजायचे असेल तर आधी स्वतःचे मन आणि शरीर स्थिर हवे . हातात रुग्णाची नाडी आणि मनात सकाळी झालेले बायको /गर्ल फ्रेंड सोबतचे 'गेट लॉस्ट .. गो टू हेल ' रुपी प्रेमळ संभाषण असेल तर नाडी सोडाच पण काहीच समजत नाही . इतकी स्थितप्रज्ञता किती लोकांच्या अंगी असते ?? नाडीचा अभ्यास सातत्याने करावा लागतो . . अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट समजत नाही तोपर्यंत प्रामाणिकपणे वारंवार करणे . . . आमचे महर्षी कणाद नाडी बद्दल काय सांगतात पहा -
प्रमेह रुग्णाची नाडी -जड , सूक्ष्म , ग्रंथिरूप
मांसाहार केला असेल तर - लगुडाकृती (लाकडा समान )
अजीर्ण - कठीण ,जड
अतिसार -शीत इत्यादी
आता यातील जड , सुक्षम , ग्रंथिरूप , लाकडासामान , शीत , कठीण नाडी म्हणजे काय ?? हे समजण्याची जिज्ञासा , क्षमता आणि अभ्यास नसणार्यांनी ' ह्या . . असे काही असते काय ??' अशी मस्करी जरूर करावी . . पण ती करण्याच्या आधी एकदा विषय संबंधी ज्ञान जरूर घ्यावे . .
सध्या सर्वांची 'अवघड जागी दुखणे आणि वैद्य /डॉकटर जावई ' अशी परिस्थिती झाली आहे . चर्चा , सल्ला , अभ्यास न करता टिंगल करणे हे सर्वात सोपे झाले आहे . नाडी कोणी पाहावी , कोणाची पाहावी , कधी पाहावी , कशी पाहावी याचे नियम आणि संकेत आहेत . याची काहीही माहिती नसताना टिंगल करणे हे सभ्यतेला धरून नाही . .
मालिकेची कळी खुलेल की नाही याच्याशी आमचे काही देणे घेणे नाही . . पण नाडी परीक्षा आणि आयुर्वेद याबाबत आदराची आणि विश्वासाची कळी कोमेजू नये म्हणून केलेला हा लहानसा लेखन प्रपंच !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती

स्वाध्याय अतिक्रमण