अस्पृश्यता

 बौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता
-महावीर सांगलीकर

भारतातील जातीवाद आणि अस्पृश्यता याबद्दल हिंदू धर्माला जबाबदार धरण्यात येते. ब्राम्हणांनी जाती तयार केल्या व कांही जातींना अस्पृश्य ठरवले असा ब्राम्हण विरोधकांचा एक लाडका सिद्धांत आहे. पण प्रत्यक्षात जाती बनण्याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत. अगदी सिंधू संस्कृतीत सुद्धा जाती आणि उच्चनीचता होती. फार तर असे म्हणता येईल की समाजातील या जातीवादाचा ब्राम्हणांनी आपल्या स्वार्थासाठी फायदा करून घेतला.

अस्पृश्यता हा मानवतेला लागलेला एक कलंक आहे असे महात्मा गांधी म्हणायचे. अस्पृश्यता ही ब्राम्हणांची देणगी आहे असे सर्वसाधारण मत आहे. ते खरे असेल नसेल, पण बौद्ध धर्मात जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता होती आणि आजही आहे हे वाचल्यावर वाचकांना आश्चर्याचा धक्का बसेल. पण हातच्या काकणाला आरसा कशाला? चला आपण वेगवेगळ्या बौद्ध देशांमध्ये बौद्ध लोक कशी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता पाळतात ते पाहुया.

भारतातील लडाख भागात 'ओरिजिनल' बौद्ध धर्म आणि त्याचे अनुयायी आहेत. त्यांच्यात जातीव्यवस्था तर आहेच पण हे बौद्ध धर्मीय लोक अस्पृश्यतेचे पालनही करतात. विशेष म्हणजे यांच्यातील अस्पृश्य जाती या वेगळ्याच आहेत. त्यात लोहार व वादक या दोन जाती मुख्य आहेत. भारताच्या इतर भागात पूर्वी अस्पृश्यांना जी वागणूक दिली जायची तशी वागणूक या बौद्धबहुल भागात तेथील विशिष्ट जातींना आजही दिली जाते.

लडाखमधील बौद्ध समाज जशी अस्पृश्यता पाळतो अगदी तशीच अस्पृश्यता नेपाळ मधील बौद्ध समाज पाळतो. भारताचा पिटुकला शेजारी भूतान हाही एक बौद्ध देश आहे. यथील बौद्ध समाजात जाती आणि अस्पृश्यता या दोन्ही गोष्टी आहेत.

तिबेट हा बौद्ध धर्माचा बालेकिल्ला मानला जातो. या देशात राग्यापा नावाची अस्पृश्य जमात आहे. त्यांना हीन वागणूक दिली जाते. इतकेच नाही तर तिबेटन बौद्ध धर्मियांचे नेते दलाई लामा यांनी दोन दशकांपूर्वी बौद्धांच्याच एका पंथाला बौद्ध समाजातून बहिष्कृत करून अस्पृश्य ठरवले. त्यांना दवाखान्यात, दुकानांमध्ये, हॉटेल मध्ये आणि मठांमध्ये प्रवेश करायला बंदी घातली.

चला आता आपण जपानला जाऊया. या देशात बुराकुमीन नावाचे अस्पृश्य लोक आहेत. त्यांची संख्या साठ लाखाहून जास्त आहे. याना जपान मधील बौद्ध आणि शिंतो या दोन्ही धर्माचे लोक अस्पृश्य मानतात. पूर्वी यांचा कोणाला स्पर्श झाला तर त्याला बौद्ध साधूकडून शुद्ध होण्यासाठी विधी करून घ्यावी लागत असे. जपानमध्ये पूर्वी अस्पृश्यता नव्हती, पण भारतातून आलेल्या बौद्ध धर्माबरोबर ती तेथे आली असे मानले जाते.

श्रीलंका हा देश बौद्धबहुल आहे. येथील सिंहली लोक हे बौद्ध धर्मीय आहेत. त्यांच्यात जातीव्यवस्था आहे, तसेच अस्पृश्यताही आहे. सिंहली समाजातील रोडी ही जात सर्वात मोठी अस्पृश्य जात आहेत. याशिवाय येथे किन्नराया नावाची एक अस्पृश्य जात आहे. भारताप्रमाणेच येथेही अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांची वस्ती गावाबाहेर असते.

बर्मा किंवा म्यानमार हाही एक बौद्ध बहुल देश आहे. हा जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक देश आहे. या देशातही जातीच जाती आहेत, तसेच अस्पृश्यताही आहे. पूर्वी येथील अस्पृश्य जातींचा प्रचंड अभ्यास महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही तेथील अस्पृश जातींचा अभ्यास करण्यासाठी या देशाला दोन वेळा भेट दिली होती. पाराग्यून ही येथील सर्वात मोठी अस्पृश जमात आहे. त्याशिवाय रोहिंग्या ही दुसरी मोठी अस्पृश्य जमात आहे. या देशातील अस्पृश्य लोक मानवाधिकारांपासून देखील वंचित आहेत.

याशिवाय कंबोडिया, विएतनाम, चीन, कोरिया, थायलंड, तैवान, मंगोलिया, होंग कोंग, लाओस हे सगळे देश, जेथे बौद्ध धर्मीयांची संख्या ७५% ते ९५% आहे, तेथे बौद्ध धर्मीयांनी त्यांच्यातीलच कांही जातींना बहिष्कृत करून त्याना अस्पृश्य ठरवले आहे.

आपल्या येथील अनेक लोक मानतात की बौद्ध धर्मात जातीव्यवस्था व अस्पृश्यता नाही. प्रत्यक्षात बौद्ध धर्मात या दोन्ही गोष्टी आहेत हे वरील माहितीवरून दिसून येते. कांही अरब देशांमध्ये, युरोपिअन देशांमध्ये देखील कांही जमातींना अस्पृश्य मानले जाते. त्यामुळे जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांचे खापर ब्राम्हणांवर फोडणे चुकीचे आहे. खरी गोष्ट ही आहे की जातीव्यवस्था व अस्पृश्यता निर्माण होण्याची खरी कारणे काय आहेत याची आपण चर्चा करत नाही.

भारतातून अस्पृश्यता ब-यापैकी नष्ट झाली, पण बौद्ध देशांमध्ये ती आजही आहे याला काय म्हणावे?

ज्यांना मी दिलेल्या माहितीविषयी शंका वाटते, त्यांनी गुगल सर्च करावे.

जातीव्यवस्था व अस्पृश्यता कशी निर्माण झाली? याची माहिती देणारा माझा लेख नंतर प्रकाशित होईलच

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

स्वाध्याय अतिक्रमण

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती